बुद्धिमत्ता आणि शिक्षणाच्या जोरावर चौफेर मुसाफिरी करा – श्री. रामदास काकडे
“आपण आज कुशल मनुष्यबळ निर्यात करणारे झालो असलो तरी, ए आय मुळे आपल्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. सर्व क्षेत्रात बुद्धिमत्ता आणि शिक्षणाच्या जोरावर आपल्याला चौफेर मुसाफिरी करता यायला पाहिजे. स्वातंत्र्यासाठी हौतात्मे देणाऱ्या देशातील शूरवीरांच्या यादीमध्ये मावळातील हुतात्म्यांचाही मोठा सहभाग होता. हेही आपण विसरता कामा नये.” असे गौरोद्गार इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष श्री रामदास काकडे यांनी काढले.
ते आज इंद्रायणी महाविद्यालयात भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह श्री. चंद्रकांत शेटे, खजिनदार श्री. शैलेश शहा, सदस्य, विलास काळोखे,संदीप काकडे, युवराज काकडे ,रणजीत काकडे, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, प्राचार्य डॉ. संजय आरोटे, प्राचार्य – जी.एस. शिंदे, उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले, उद्योजक संदीप गोरख काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ध्वजारोहण समारंभ संस्थेचे जेष्ठ सदस्य श्री संजय साने यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी संजय साने बोलताना म्हणाले, “स्वातंत्र्य दिन म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी हौतात्मे पत्करणाऱ्या शूरवीर जवानांचे बलिदान स्मरण करण्याचा दिवस आहे. तसेच सैनिकांना मानवंदना देण्याचा दिवस आहे. आपण जातीपाती आणि भ्रष्टाचार बाजूला ठेवून एकसंघ समाज निर्माण करण्याचा संकल्प केला पाहिजे.” पुढे बोलताना श्री. रामदास काकडे म्हणाले,
“संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम अशी मोठी संत परंपरा आपल्या लाभली आहे. आपला देश सर्वात सामर्थ्यवान आणि आनंदी देश कसा होऊ शकेल, यासाठी प्रत्येकाने विचार केला पाहिजे.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी केले. आज ७८ वा स्वातंत्र्य दिन भारतासह देशभरात उत्साहाने साजरा केला जात असताना आपल्या शूरवीरांनी दिलेल्या त्यागाचे बलिदानाचे आपण स्मरण केले पाहिजे.” असे ते म्हणाले.
यावेळी बंधुता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. विजय खेडकर आणि वरिष्ठ महाविद्यालयातील प्रा. राजेंद्र आठवले तसेच अनुक्रमे फार्मसी व विज्ञान विद्याशाखेत पीएचडी प्राप्त केल्याबद्दल डॉ. गणेश म्हस्के आणि डॉ. रोहित नागलगाव यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
तसेच क्रीडा क्षेत्रात सुवर्णपदक प्राप्त करून उज्ज्वल कामगिरी करणारी महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा मोईकर हिचा विशेष सत्कार करण्यात आला.संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष श्री. रामदास काकडे यांच्या शुभहस्ते हर्षदा मोईकरला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर आर डोके यांनी केले. तर आभार उपप्राचार्य प्रा. संदीप भोसले यांनी मानले.