कामशेतमध्ये उभारणार श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा
कामशेत येथे लोक वर्गणीतून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. कामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच रूपेश गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेला दीडशेहून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामसभेत एक विशेष ठराव यासाठी मंजूर करण्यात आला. कामशेत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लोक वर्गणीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा अश्वारूढ पुतळा उभारला जाणार आहे, याचा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. वीस फूट उंच, अठरा फूट लांब आणि अठरा फूट रुंद अष्टकोनी चबुतरावर पुतळा उभारण्यात येणार आहे. सदर पुतळ्यचे काम शिल्पकार दीपक थोपटे यांना सर्वानुमते देण्यात आले. पुतळा निर्माण झाल्यानंतर त्याची सर्व देखभाल करण्याची जबाबदारी ही कामशेत ग्रामपंचायतची असेल असेही ठरवण्यात आले. या ग्रामसभेत प्रामुख्याने तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. तसेच हा ठराव मंजूर व्हावा यासाठी या ग्रामसभेत उपस्थित राहण्यासाठी सर्वांना संदेश पाठविणयात आले होते. ठराव मंजूर झाल्यामुळे समस्त ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला. तसेच ग्रामस्थांच्या काय समस्या आहेत, काय नाही यावर चर्चा करण्यात आली.