कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे लवकरच लोकार्पण -आमदार सुनिल शेळके
आंदर मावळ मधील नागरिकांसाठी आरोग्याची अद्ययावत सुविधा होणार उपलब्ध
कान्हे उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची आमदार सुनिल शेळके यांच्याकडून पाहणी
– कान्हे उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या कामाची पाहणी आमदार सुनिल शेळके यांनी केली. रुग्णालयातील कामे अंतिम टप्प्यात असून ती लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच केले जाणार असल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक एम पल्ली, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद बारभाई, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धनराज दराडे, वैद्यकीय अधीक्षक वर्षा पाटील, शाखा अभियंता नंदकुमार खोत व इतर अधिकारी उपस्थित होते.
कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे काम बर्यापैकी पूर्ण झाले आहे. काही किरकोळ कामे अंतिम टप्प्यात आहेत. रुग्णालयातील सोयी सुविधा, विविध विभागातील वैद्यकीय सामग्री ही कामे त्वरित पूर्ण करावीत. ट्रॉमा केअर सेंटरमध्येही आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा कराव्यात, तसेच अधिक निधीची आवश्यकता भासल्यास तांत्रिक कार्यवाही पूर्ण करुन उर्वरित कामांना गती देण्याबाबतच्या सूचना आमदार शेळके यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कान्हे येथील ग्रामीण रुग्णालय अद्ययावत व्हावे ही तालुकावासीयांची अनेक वर्षांपासून इच्छा होती.आज कान्हे ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार होऊन उपजिल्हा रुग्णालय व ट्रॉमा केअर सेंटर अशी भव्य इमारत उभी राहिली आहे. नवीन आराखड्याप्रमाणे सुसज्ज असे रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांना सक्षम आरोग्य सेवा देण्यासाठी सज्ज होत आहे.यामुळे तालुक्यातील सार्वजनिक आरोग्यसेवेला बळकटी मिळणार आहे.
हे रुग्णालय आंदर मावळसह ग्रामीण भागातील रुग्णांना एक उत्तम आरोग्यसेवा देणारे मध्यवर्ती केंद्र ठरणार असल्याचा विश्वास आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला.