आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराचा उद्या शेवटचा दिवस
महाआरोग्य शिबिराचा घेतला 40 हजारांहून अधिक नागरिकांनी लाभ
जास्तीत जास्त नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेण्याचे आवाहन
मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ डेव्हलपमेंट फाउंडेशनने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा उद्या (शनिवारी) शेवटचा दिवस आहे. आतापर्यंत 40 हजारांहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आहे. समारोपाच्या दिवशी अधिकाधिक नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कान्हे उपजिल्हा रुग्णालय येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाआरोग्य शिबिर होणार आहे. तसेच मावळातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत ही आरोग्य दिंडी पोहचावी म्हणून निरोगी मावळचा संकल्प करणारे हे महाआरोग्य शिबिर शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी तळेगाव दाभाडे आणि देहूरोड छावणी परिषद परिसरातील रहिवाशांसाठी शिबिराचे आयोजन केले आहे. शेवटचा दिवस असल्यामुळे तालुक्याच्या अन्य भागात राहणाऱ्यांनीही या वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.
मागील आठ दिवसांपासून सुरु असलेल्या शिबिराची तालुक्यात जोरदार चर्चा आहे. सर्वसामान्य नागरिकांना विविध आजारांवर उपचार तसेच वैद्यकीय साहित्य, औषधे,चष्मे मोफत मिळत असल्याने दिवसेंदिवस या ठिकाणी गर्दी होताना दिसत आहे.ग्रामीण भागातून आवश्यकतेनुसार नागरिकांच्या मागणीप्रमाणे जाण्या-येण्याची व्यवस्था संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
या शिबिरात एमआरआय तपासणी, सिटीस्कॅन तपासणी, सोनोग्राफी, एक्स-रे, रक्त तपासणी, मोफत चष्मे, औषधे, श्रवण यंत्र या सुविधांबरोबरच मोफत रुग्णवाहिका सेवा देखील देण्यात येणार आहे. शिबिरा अंतर्गत हृदयाच्या शस्त्रक्रिया, अन्ननलिका शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, हाडांचे फ्रॅक्चर, कान -नाक–घसा शस्त्रक्रिया, श्वसनालिकेच्या शस्त्रक्रिया, अंगावरील मोठ्या चरबीच्या गाठीची शस्त्रक्रिया, मणक्याच्या, किडनीच्या, गर्भपिशवीच्या, मुतखड्याच्या, सांध्याच्या, अपेंडिक्सच्या, मूळव्याधीच्या शस्त्रक्रिया, मॅमोग्राफी, हर्निया, पित्ताशय किंवा पित्ताशयातील खड्यांची शस्त्रक्रिया, कॅन्सर संदर्भात शस्त्रक्रिया, गर्भाशयातील गाठींची शस्त्रक्रिया, डोळ्यांचा तिरळेपणा व अन्य समस्यांबद्दल शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रिया होणार आहेत. या सगळ्या शस्त्रक्रिया मोफत आणि सवलतीच्या दरात होणार आहेत. तसेच रक्त तपासणी आणि नेत्र तपासणी मोफत करण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.