महायुतीचा आमदार करा, मावळाला पुढच्या पाच वर्षांत 5,000 कोटींचा निधी देईन – अजित पवार
मावळ व राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती शासन कटिबद्ध – अजित पवार
सुनिल शेळके यांना आमदार केले, तीन वर्षात 4,000 कोटींचा निधी दिला – अजित पवार
लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे दहा तारखेला खात्यावर जमा होतील – अजित पवार
– मागील विधानसभा निवडणुकीत मावळात सुनिल शेळके यांना निवडून दिलेत, कोविडचे एक वर्ष व विरोधातील एक वर्ष सोडून उरलेल्या तीन वर्षांत मावळला 4,000 कोटींचा निधी दिला. येत्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा पुढील पाच वर्षात आणखी 5,000 कोटींचा निधी देईन, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज (शुक्रवारी) केली.
मावळ तालुक्यातील विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन श्री. पवार यांच्या हस्ते कान्हे येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार सुनील शेळके, माजी आमदार रुपलेखा ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, गणेश आप्पा ढोरे, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष दिपाली गराडे तसेच शंकरराव शेळके, विठ्ठलराव शिंदे, रामनाथ वारिंगे, कृष्णा कारके, सुरेश धोत्रे, मयूर ढोरे, विलास बडेकर, विक्रम कदम, देवा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
कान्हे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण तसेच लोणावळा लायन्स टायगर पॉईंट येथील ग्लास स्काय वॉक, कार्ला येथील एकविरा देवी मंदिर विकास आराखडा, सुदुंबरे येथील संत जगनाडे महाराज समाधी मंदिर विकास आराखड्याचे भूमिपूजन श्री.पवार यांच्या हस्ते झाले.
महायुती सरकारने घेतलेले विविध धोरणात्मक निर्णय तसेच केलेली विकासकामे यांची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी त्यांच्या भाषणात दिली. मावळच्या जनतेने गेल्यावेळी सुनील शेळके यांच्यासारखा चांगला उमेदवार निवडून दिला. सुनील शेळके यांनी मिळालेल्या संधीचा वापर लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व मावळच्या विकासासाठी केला. त्यांनी घेतलेले परिश्रम केलेला पाठपुरावा यामुळे मावळच्या विकासाला चांगली गती मिळाली आहे, असे ते म्हणाले.
उमेदवारी मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र महायुतीच्या वतीने देण्यात येणाऱ्या उमेदवाराचेच प्रामाणिकपणे काम करा, असा सल्ला त्यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना दिला. केंद्रात व राज्यात एकाच विचारांचे सरकार असणे आवश्यक आहे. तसे झाले नाही तर राज्याच्या विकासावर विपरीत परिणाम होऊ शकतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मावळातून महायुतीचा उमेदवार निवडून आणा, पुढच्या पाच वर्षात 5,000 कोटींपेक्षा अधिक निधी मावळला देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
लाडक्या बहिणींना 10 तारखेला ‘ॲडव्हान्स भाऊबीज’
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी भगिनींच्या बँक खात्यात येत्या 10 तारखेला ऑक्टोबर व नोव्हेंबरचे पैसे जमा होतील, अशी माहिती पवार यांनी दिली. वीज पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांचे विज बिल शून्यावर आणल्याची मावळातील तीन उदाहरणे त्यांनी नावानिशी सांगितली. महायुती शासनाने सुरू केलेल्या योजना पुढे चालू राहण्यासाठी मावळातून महायुतीचाच आमदार निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.
लोककल्याणकारी योजना राबविताना राज्यात विकास कामांना निधी कमी पडू दिला नाही. महायुतीच्या सरकारने सर्व घटकांना न्याय देण्याबरोबरच राज्याचा नियोजनबद्ध विकास सुरू ठेवला, असे ते म्हणाले.
मावळ तालुक्यात गेल्या पाच वर्षांमध्ये केलेल्या विविध विकास कामांचा आढावा आमदार शेळके यांनी मांडला. 4 ऑक्टोबर 2019 ला सुमारे 35 ते 40 हजार मायबाप जनतेच्या साक्षीने आपण विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरला होता. आज असं कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करतानाचा दिवस देखील तोच आहे. मावळात मूलभूत सुविधांबरोबरच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचीही आवश्यकता होती. त्यापैकी बरेचसे प्रकल्प पूर्ण करता आले याचे समाधान आहे,असे ते म्हणाले.
‘इंद्रायणी तांदळाला प्रति किलो किमान 33 रुपये भाव द्या’
मावळातील शेतकऱ्यांना इंद्रायणी तांदळाला प्रति किलो 33 रुपये इतका किमान दर मिळावा, अशी सूचनाही आमदार शेळके यांनी यावेळी केली. तालुक्यातील रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. महामार्गावर आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल करणे, तळेगावला बंद जलवाहिनीतून पाणी यासह पुढील नियोजित विकास प्रकल्पांचा त्यांनी ऊहापोह केला.
‘दादागिरी, दहशत, बदनामी खपवून घेणार नाही’
इच्छुक उमेदवारांकडून मावळ तालुक्यातील जनतेला होत असलेली दादागिरी दहशत खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आमदार शेळके यांनी दिला. मावळच्या जनतेची सेवा व मावळचा विकास आपण तळमळीने केला. मावळचे भवितव्य हे सर्वांगीण विकासाचेच आहे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी प्रास्ताविक केले.