आंबी-निगडे रस्त्यावर रास्ता रोको
अवजड वाहतुकीवर बंदी घालण्याची ग्रामस्थांची मागणी
आंबी-मंगरूळ-आंबळे-निगडे रस्त्याचे काम जोपर्यंत होत नाही. तोपर्यंत अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करावी, या मागणीसाठी चारही गावांतील ग्रामस्थांनी सोमवारी (ता.५) मंगरूळ येथे रास्ता रोको आंदोलन केले.
दररोजच्या शेकडो अवजड वाहनांमुळे आंबी ते निगडे रस्ता अनेक वर्षांपासून खड्डेमय झाला आहे. तेथून प्रवास करताना अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वारंवार सांगूनही रस्त्याचे काम केले जात नसल्याच्या निषेधार्थ आंबी, मंगरूळ, आंबळे आणि निगडी या चारही गावांतील ग्रामस्थांनी सोमवारी रस्ता रोको आंदोलन केले. माजी उपसरपंच शांताराम कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. निगडे गावचे सरपंच भिकाजी भागवत, आंबळेच्या सरपंच आशा कदम, कृष्णा भांगरे, गणेश भांगरे, नामदेव भसे, भरत घोजगे, संदीप गायकवाड, रूपेश घोजगे, बाळा शेटे, अनिकेत घोलप, चंद्रकांत तांबोळी, शांता पवार, रूपाली चव्हाण, नवनाथ मोढवे, मुरलीधर पवार यांच्यासह अन्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंगरूळ येथे आंबी, मंगरूळ, आंबळे आणि निगडे ग्रामस्थ रास्ता रोको आंदोलन करत असताना.
आंदोलनाच्यावेळेस पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून नायब तहसीलदार पिसाळ यांना निवेदन देण्यात आले. आंबी ते निगडे रस्त्याच्या कामाला ३० कोटी रुपये मंजूर आहेत. मात्र, रस्ता रुंदीकरण करताना शेतकऱ्यांच्या जमिनी जातात. त्या जमिनीचा मोबदला त्वरित मिळावा. त्यानंतरच रस्त्याचे काम सुरू करावे. तोपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालावी, अशी मागणी शांताराम कदम यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ